Tuesday 13 October 2015

श्री कर्दळीवन परिक्रमा एक अनुभव



सौ. मीरा अरुण चाफाडकर, ८९७५५७६२४६
कर्दळीवन सेवा संघातर्फे आयोजित चौदाव्या परिक्रमेमध्ये आम्ही गोव्यातून बारा सदस्यांनी भाग घेतला होता. या परिक्रमेत सहभागी होण्यापूर्वी प्रा. क्षितिज पाटुकले यांचे पुस्तक वाचनात आले. पुस्तकातील माहिती वाचून अंगावर शहारे आले. मनामध्ये खूपच कुतूहल निर्माण झालं! 


या परिक्रमेमध्ये जवळजवळ पन्नास सदस्यांनी भाग घेतला होता. दोन-तीन दिवसांत सर्व सदस्यांमध्ये छान ओळख होऊन आपुलकीही निर्माण झाली. दि. २५ डिसेंबर २०१३ ते २८ डिसेंबर २०१३ पर्यंतचा काळ आमच्यास संसारापासून कितीतरी दूर निघूल आलो होतो व कुटुंबातील सदस्यांना तीन दिवस संपर्क होणार नाही याचीही कल्पना दिली होती. पण ते तीन दिवस आम्ही निश्चिंत होतो.

आत्ताचं आरामदायी व सुखसोयींचं जीवन व कर्दळीवनातील मुक़्काम यामध्ये खूपच फरक आहे; पण कोणतीही अडचण भसली नाही. व्यंकटेश किनाऱ्यावरील मुक़्कामी ’राजस जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या’ या कवितेची (संत तुकडोजी महाराज), शालेय जीवनात अभ्यासलेल्या कवितेची आठवण झाली.
व्यंकटेश किनारा ते अक़्कमहादेवी गुफा मंदिरापर्यंतचा प्रवास व नंतर गुंफेतील दोन दिवसांच्या मुक़्कामात मन प्रसन्न झाले. किनारा ते अक़्कमहादेवी गुंफा मंदिरापर्यंत वाटेत लागलेली मोठी चढण कशी पार केली ते कळले देखील नाही. चढण चढताना दमलो होतो पण वाटेत कुठेही बसावेसे वाटले नाही. कुठल्यातरी अनामिक ओढीने ती चढणे आम्ही सहज पार केली. त्यानंतर श्री स्वामी समर्थ प्रकटस्थान व बिल्ववन येथे आल्यानंतर तो निसर्ग व पवित्र वातावरण पाहून स्वर्गात असल्याचा आनंद झाला.
श्री स्वामी समर्थांच्या प्रकाटस्थानी अंघोळी उरकून प्रत्येकजण आपापल्या साधनेमध्ये मग्न होता. मी व माझी मैत्रीण स्वामींच्या नामस्मरणासाठी जागा शोधू लागलो तेव्हा एका गृहस्थाने जवळच्या दगडाकडे बोट दाखविले व आम्हाला पण ती जागा आवडली, आम्ही दोघीजणी त्या दगडावर जाऊन बसलो. काही वेळाने मन स्थिर झाले. थोडा वेळ तर माझ्या डोळ्यांतून पाणी वाहत होते. मानतल्या मनात स्वामींचे नामस्मरण चालू होते. अचानक कुणाच्या तरी स्पर्शाने जाग आली. दोघांनी डोळे उघडून पाहिले तर तो कुत्र्याचा स्पर्श होता. व्यंकटेश किनारा ते बिल्ववनापासून परत स्वामी समर्थ प्रकट स्थानापर्यंतचा प्रवास या कुत्र्याने आमच्या सोबत केला होता.
क्षणभर वाटले आमच्याबरोबर इतर मैत्रिणी होत्या त्यांच्यापैकी कुणाच्यातरी ओढणीचा स्पर्श झाला असेल!
नंतर खिचडीचा प्रसाद घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद द्विगुणित झाला होता.
परिक्रमेच्या शेवटच्या दिवशी जेव्हा सर्व सदस्य व्यंकटेश किनारी येऊन चहा नाश्ता आटोपून बोटीमध्ये बसून श्रीशैल्यमच्या बाजूने परतीच्या प्रवासाला निघालो, ‘दिगंबरा दिगंबरा’ अशा नामघोषात जेव्हा बोटीने किनारा सोडला त्यावेळी आम्हाला तीन दिवस अन्नपाणी पुरविणारे अप्पाजी हात हलवत निरोप घेण्यासाठी किनाऱ्यावर उभे राहिले तेव्हा सर्वांच्या डोळ्यात पाणी आले. जणूकाही स्वामीच्या रुपात अप्पाराव आम्हाला सांगत होते, “घाबरु नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.”