Friday, 12 December 2014

ओळख आणि महात्म्य

कर्दळीवन..
  श्रीदत्त संप्रदाय आणि श्री स्वामी समर्थ संप्रदाय यामध्ये कर्दळीवनाचे विलक्षण महात्म्य आहे. कर्दाळीवन हे ठिकाण आंध्रप्रदेश राज्यामध्ये श्रीशैल्य या ज्योतिर्लिंग आणि शक्तिपीठाजवळ आहे. अक़्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ हे कर्दळीवनात प्रकट झाले. गुरुचरित्रामध्ये असा कथाभाग आहे की श्रीनृसिंहसरस्वती हे १३ व्या शतकात श्रीशैल्य जवळील पाताळगंगेच्या पात्रात एका बुट्टीत बसून कर्दळीवनात गेले आणि तेथे एका अश्वत्थ वृक्षाखाली बसून त्यांनी तप: साधना केली. ते बसलेल्या ठिकाणी त्यांचेभोवती एक वारुळ तयार झाले. अशीच साडेतीनशे वर्षे गेली. एक लाकुडतोड्या झाडाचे लाकूड तोडताना त्याचा आघात होऊन त्यांची समाधी भंग पावली. तेव्हा त्या वारुळातून अक़्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले. श्रीशैल्य या ज्योतिर्लिंगाजवळ कृष्णा नदी पाताळगंगा रुपाने जवळजवळ २०० कि. मी वाहते. हा सर्व परिसर अत्यंत घनदाट अरण्याने वेढला आहे आणि अत्यंत दुर्गम असा आहे. तेथे जाण्यासाठी किमान सोयी उपलब्ध व्हायला इ. स. २०१२ हे साल उजाडले. कर्दळीवनात चेंचू या जमातीचे आदिवासी राहतात.
   कर्दळीवनाविषयी अनेक समज अपसमज आणि श्रद्धा आहेत. इतर तीर्थक्षेत्री आपल्याला इच्छा असल्याशिवाय जाता येत नाही. भारतात दरवर्षी १ लाखातून १ व्यक्ती काशी- रामेश्वरला जाते, १० लाखातून एक बद्री केदारनाथला जाते, २५ लाखामधून एक नर्मदा परिक्रमा करते, ५० लाखांतून एक कैलास मानस सरोवर यात्रेला जाते. मात्र कर्दळीवनात १ कोटीतून एखादीच भाग्यवान व्यक्ती जाते. त्यामुळे कर्दळीवनाविषयी लोकांना फार माहिती नाही.
   कर्दळीवन नवनाथ आणि नाथपंथी साधू, योगी यांचे साधनास्थळ आहे. तसेच ती सिद्धांची भूमी आहे. नागार्जुन, रत्नाकर इ. सिद्धांची प्रयोगशाळा म्हणजे कर्दळीवन. कोणत्याही मूलद्रव्याचे सुवर्णामध्ये रुपांतर करायचे तंत्र त्यांनी विकसीत केले होते. कर्दळीवनात विलक्षण अद्भुत आणि दैवी अनुभूती येतात. कर्दळीवनाची माहिती इ. स. २००९ पासून हळूहळू होऊ लागली. कर्दळीवन पंच परिक्रमा पूर्ण केलेल्या परिक्रमार्थींना आलेल्या अनूभुती अत्यंत विलक्षण आहेत. हे स्थान इतके वर्ष का गुप्त होते आणि आत्ताच ते का प्रकट झाले, हे न सुटणारे कोदे आहे.
   कर्दळीवनात कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. ज्या नृसिंहसरस्वती समाधिस्त झाले आणि स्वामी समर्थ प्रकट झाले त्या ठिकाणी कोणतीही व्यवस्था नाही. तेथे जाणाऱ्या भक्तांसाठी अनुष्ठान सेवा करण्यासाठी सुविधा उपलब्ध नाहीत. त्यांचेसाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था, नियम नियमावली नाही. " कर्दळीवन : एक अनुभूती " या पुस्तकाचे वाचक, भक्त आणि कर्दळीवन पंच परिक्रमा पूर्ण केलेल्या अनेक व्य्क्तींनी एकत्र येऊन कर्दळीवन सेवा संघ ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली आहे. कर्दळीवनासंबंधी जनमानसात, भावुक भक्तजनांत जागृती निर्माण व्हावी, अधिकाधिक व्यंक्तींनी कर्दळीवनास भेट द्यावी या उद्देशाने कर्दळीवन सेवा संघ ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. 


No comments:

Post a Comment